
गुजरातमध्ये जळगावच्या कुटुंबाला कालव्यात फेकण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर…
जळगाव: गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात भररस्त्यात गाडी अडवून पाटील कुटुंबाला कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिले होते. संपूर्ण कुटुंबाला संपवण्यामागील भयंकर कारण समोर आलं आहे. सूरत पोलिसांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना ही माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी नितीन ऊर्फ भुरिया पाटील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रोजगाराच्या शोधात ते पत्नी आणि मुलांसह २१ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या सुरत येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ एका कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचे वाहन अडवले. आरोपींनी पाटील कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने खाली ओढले आणि जवळच्या कालव्याच्या वेगवान प्रवाहात फेकून देऊन तिथून पळ काढला.
पाण्यात फेकल्यानंतर कुटुंबातील सदस्य वाहून जाऊ लागले. अशा मृत्यूच्या दाढेतही एका १३ वर्षीय मुलाने प्रचंड प्रसंगावधान दाखवले. पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत त्याने कालव्यातील एका पाईपला घट्ट पकडून ठेवले आणि मोठ्या कष्टाने तो पाण्याबाहेर आला. जीवाच्या आकांताने धावत त्याने जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन घडलेला सर्व थरार सांगितला. हॉटेलमधील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला.
View this post on Instagram
पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने कालव्यात शोधमोहीम राबवली. मोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात नितीन ऊर्फ भुरिया पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि कुटुंबातील एका तरुणीचा मृतदेह हाती लागला आहे. तर, प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने सुरतच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती महाजन यांना दिली. कालव्यात फेकण्यात आलेले पाटील कुटुंब एका विमा घोटाळ्याच्या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार होते. न्यायालयात किंवा तपासात त्यांची साक्ष जड जाऊ नये, म्हणूनच साक्षीदारांना संपवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने आता तपास सुरू केला आहे.
या अमानुष हत्याकांडाप्रकरणी बारडोली ग्रामीण पोलिस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरत ग्रामीण पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. पण, जळगावच्या या मराठी कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
गुजरातमध्ये कार रोखली अन् जळगावच्या 6 जणांना फेकलं कालव्यात…
पुणे! मंदार किवळे रक्तबंबाळ होऊन चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे शब्द अन् आरोपींची नावे समोर…
महाराष्ट्राचे सुपूत्र अन् IPS विनायक भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई…
मुंबई! पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर फटाके वाजवणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली…
पुणे! हिंजवडी IT हबमध्ये प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट; कारण समोर…

