
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवाच्या अत्यंत कडक आणि सततच्या बंदोबस्ताच्या तणावातून एका कर्तव्यदक्ष पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दत्तात्रय तेलंगे असे निधन झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहरात गणेशोत्सवाचा सण सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिस दलावर मोठा ताण आहे. हवालदार दत्तात्रय तेलंगे हे देखील गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तावर राहिल्यानंतर, आज पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
View this post on Instagram
श्री दिपक जोग सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद आणि ई सी पी वास्तू कॅम्पस (हांडेवाडी रोड, हडपसर) परिसराचे रहिवासी असलेले दत्तात्रय तेलंगे हे त्यांच्या मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पुणे पोलिस दलासह हडपसर परिसरातील मित्र परिवारावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार, ता. २५) हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मित्र परिवार आणि ई सी पी वास्तू कॅम्पस रहिवासी संघाने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…
पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…
एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…
ठाणे शहरात दारुड्या गावगुंडाने गस्तीदरम्यान केली पोलिस अधिकाऱ्याची हत्या…
पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…

