रबर कंपनीच्या गोदामाची भिंत कोसळून पालघर जिल्ह्यात तीन कामगारांचा मृत्यू, पोलिस तपास चालू…

पालघर: पालघर जिल्ह्यात वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमगड रोड येथे असलेल्या टीना रबर कंपनीच्या गोदामाची भिंत अचानक कोसळून, त्याखाली गाडले गेल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सुटीच्या काळात अनेक कामगार जवळच नाश्ता करत बसले होते. भिंतीपासून जवळच बसलेले तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले, की हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. टीना रबर कंपनीतील कामगार नाश्ता करत असताना जवळच्याच एका गोदामाची भिंत अचानक कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले. भिंत कोसळल्यानंतर लगेच घटनास्थळी असलेल्या लोकांनी ढिगारा हटविण्यास आणि कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विक्रमगडमधील मोहा गावातील केशव वाल्कू गुंगुणा, विक्रमगडमधील वसुरी येथील रहिवासी मीरा गवळी आणि वाडा येथील कोंब पोशेरी येथील रहिवासी रंजना दिलीप कोंब यांचा समावेश आहे. अपघाताची परिस्थिती आणि भिंत कोसळण्याच्या कारणाचा तपास सुरू आहे. मात्र, या अपघातामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!