
दिल्लीतून माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या व्यक्तीची हत्या; मृतदेह फेकला गटारात…
नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक तातडीची बैठक असल्याचे सांगून, दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून आपल्या निघालेल्या युवराज सिंग मनचंदा (वय ३१) या तरुणाची, त्याची माजी महिला सहकारी आणि तिच्या जोडीदाराने त्याची हत्या केली. हत्येमागे आर्थिक वाद असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. तरुणाचा मृतदेह एका गटारात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला आहे.
६ सप्टेंबर रोजी, तो आपल्या बहिणींसोबत दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमध्ये स्वतःसाठी शेरवानी खरेदी करण्यासाठी गेला. त्यानंतर दुपारी सुमारे ४.१५ वाजता ते परिसरातील गोल्डन ड्रॅगन रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी थांबले. गुरुग्रामला त्याच्या माजी सहकाऱ्याला भेटायचे आहे असे बहिणींना सांगून तो निघून गेला.
पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले. रात्री १० वाजेपर्यंत घरी येऊ, असे त्याने सांगितले. मात्र, तो परत न आल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दोन दिवसांनंतर, ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४:१६ च्या सुमारास, त्यांना युवराजकडून शेवटचा व्हॉट्सॲप संदेश मिळाला. त्यानंतर त्याचा फोन पुन्हा बंद झाला. ११ सप्टेंबर रोजी युवराजच्या कुटुंबीयांनी लाजपत नगर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
युवराजच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, गुरुग्राम पोलिसांना १० सप्टेंबर रोजी मृतदेह सापडला, परंतु त्यांनी त्यांना कळवले नाही, तसेच ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती झोनल इंटिग्रेटेड पोलीस नेटवर्कवर (झिपनेट – अज्ञात मृतदेह तपासण्यासाठीचे सरकारी पोर्टल) वेळेवर अपलोड केली गेली नाही. अखेरीस पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. म्हणजे पीडित कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती मिळण्याच्या दोन दिवस आधी.
कायद्यानुसार, एका निर्धारित प्रतीक्षा कालावधीनंतर बेपत्ता व्यक्तींच्या नेटवर्कवर अनिवार्यपणे माहिती प्रसिद्ध करूनही जर मृतदेहाची ओळख पटू शकली नाही, तर अधिकारी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकतात.
पीडित कुटुंबाने शवविच्छेदन अहवाल, चौकशीची कागदपत्रे, छायाचित्रे, डीएनए नमुने आणि युवराजच्या वस्तू जतन करून कुटुंबाला उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. युवराज हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता. त्याचे वडील पक्षाघाताने ग्रस्त आहेत, तर त्याच्या आईला हृदयरोग आहे.
तपासात असे उघड झाले, की युवराजने त्याची माजी सहकारी असलेल्या वत्स नावाच्या महिलेला भेटायला गुरुग्रामला गेला होता आणि तिच्यासोबत त्याचा शेवटचा फोन कॉल झाला होता. तिचा फोन बंद होता, त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले, तसेच युवराज आणि संशयित महिलेच्या कार्यालयात चौकशी केली.
त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून वापरला जाणारा एक नवीन मोबाईल नंबर शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी तिला उत्तराखंडमधून अटक केली.
चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी युवराजची हत्या करून त्याचा मृतदेह गुरुग्राममधील त्यांच्या घराशेजारील गटारात टाकल्याचे कबूल केले. या हत्येमागे आर्थिक वाद हे कारण असल्याचा संशय असला तरी, आरोपी महिला हत्येमागील खरे कारण लपवित असल्याचा आरोप युवराजच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गुन्ह्यामागील हेतू आणि तो कसा घडला हे निश्चित करण्यासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

