पिंपरी-चिंचवड पोलिसांचा औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरीला कडक इशारा…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात उद्योजक, व्यावसायिक, कामगार व विविध आस्थापनांना धमकावून खंडणी मागणाऱ्या तसेच दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कठोर व
प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.

एम. आय. डी. सी. भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती अधिकाराचा धाक दाखवून, कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागुन २५ लाख रूपये स्विकारणाऱ्या चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. आरोपींनी मागील सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून, कंपनीचे काम योग्य नसल्याचे सांगत तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा
असल्यास ५ कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीची वाट लावण्याची व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत खंडणी विरोधी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस ठाणे गु.र.क्र. ६१३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (३), ३०८ (४), ३०८ (५), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ५३), रमेश भिमा मांजरेकर (वय ३९) व सुनील राजेंद्र कानू (वय ३५) यांना आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील मारुती सुझुकी XL – ६ या वाहनातून आरोपी फिर्यादीकडे आले होते. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत चर्चा करण्यात आली व आरोपी राहुल मिश्रा याने फिर्यादीकडून २५ लाख रुपये रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅगसह स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

औद्योगिक परिसरातील कोणत्याही उद्योजक, व्यावसायिक किंवा आस्थापनावर दबाव आणून पैसे मागणे, धमकी देणे, जबरदस्ती करणे, दहशत निर्माण करणे अथवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणे कदापि सहन केला जाणार नाही. अशा घटनांमध्ये केवळ किरकोळ स्वरूपाची कारवाई न करता, घटनेचे गांभीर्य, आरोपींची भूमिका व उपलब्ध पुरावे यांच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS ) व इतर लागू कायद्यांतील कठोर कलमांनुसार गुन्हे दाखल करून प्रभावी तपास करण्यात येईल. गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार, प्रत्यक्ष खंडणी मागणारे मध्यस्थ तसेच आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पिंपरी -चिंचवड पोलिसांचे स्पष्ट धोरण आहे की, ” औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही.” उद्योजक व व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तक्रारदार तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार व सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे – २ सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, किशोर कांबळे, प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप गोडांबे व दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने केली.

औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणतीही माफी अथवा सहनशीलता दाखवली जाणार नाही. कायद्याचा धाक निर्माण करून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा प्रभावीपणे बंदोबस्त करण्यात येईल.
– रोहिदास पवार, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड

रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…

पिंपरी-चिंचवड पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये रंगला चकमकीचा थरार; गोळीबारात दरोडेखोर जखमी…

पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!