गोरक्षकांकडून जालन्यात दलित तरुणाला मारहाणीचा आरोप; अद्याप अटक नाही

जालनाः कसायाकडून विकत घेतलेला बैल विकण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून, एका दलित व्यक्तीला मारहाण करणे आणि त्याला शेण खाण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (ता.२७) सहा ‘गोरक्षकां’विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मे महिन्यात घडली असली तरी, कथित हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदार परमेश्वर सुहास हिवाळे यांनी पोलिसांना सांगितले, की ते २३ मे रोजी देऊळगाव राजा येथील आठवडी बाजारात एक बैल खरेदी करून आपल्या ११ वर्षे वयाच्या मुलासोबत आणि नारायण मारोती कांबळे नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत जालना येथे परत येत होते.

बजरंग दलाचे सदस्य आणि गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या एका गटाने कन्हैयानागर परिसरात त्यांचे वाहन अडवले आणि हिवाळे हे जनावर एका मुस्लिम कसाईला विकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला.

आरोप नाकारून जनावराच्या खरेदीशी संबंधित कागदपत्रे दाखवूनही, त्यांनी त्याला थप्पड मारली, त्याचे नाव आणि जात विचारून जातीय शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्याच्या तोंडात शेण कोंबले. त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या तोंडात जबरदस्तीने शेण घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण त्याने प्रतिकार केला, असा आरोप हिवाळे यांनी केला आहे.

त्यांचे साथीदार कांबळे यांनाही कथितरित्या शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि वाहनाचेही नुकसान केले. आरोपींपैकी एकाने ही घटना मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली आणि पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली.

घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर फिरत असल्याचे समजल्यानंतर हिवाळे यांनी २१ ऑगस्ट रोजी जालना तहसील पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२) (अवैध प्रतिबंध), ११५(२) (इच्छेने दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचवणे), १८९(२) (बेकायदेशीर जमाव) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींनुसार ओळख पटलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली.

या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून, एक उपविभागीय पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रम साली यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!