अमेरिकेत तरुणीच्या हत्येप्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून आग्र्यामध्ये अटक

हैदराबादः भारतीय वंशाच्या तरुणीच्या अमेरिकेत झालेल्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपीला, हैदराबाद पोलिसांनी शोध घेऊन आग्रा येथे अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले, की निकिता गोडीशाला (वय २७) हत्येप्रकरणी हवा असलेला अर्जुन शर्मा (वय २६), याला अटक करण्यात आली आहे. तिच्या वडिलांनी याबाबत लालगुडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सांगितले, की शर्मा हा आग्रा येथील एका फ्लॅटमध्ये सापडला आणि त्याला फसवणुकीच्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली. अमेरिकेत त्याच्याविरुद्ध यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अजामीनपात्र वॉरंट प्रलंबित असल्याने, केंद्रीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. नंतर केंद्रीय यंत्रणांनी त्याला नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. त्याला खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अमेरिकेतील एलिसिट सिटीमध्ये राहणारी निकिता २ जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. हार्वर्ड काउंटी पोलिसांनी सांगितले होते, की ती मेरीलँडमधील कोलंबिया येथील तिचा माजी रूममेट अर्जुन शर्मा याच्या अपार्टमेंटमध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत मृत आढळली होती. अमेरिकी पोलिसांनी शर्मावर प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या हत्येचा आरोप ठेवत अटक वॉरंट मिळवले होते. निकिताची हत्या करून त्याने भारतात पलायन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी त्यांना ४ जानेवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अधिकृतपणे तिच्या मृत्यूची माहिती दिली होती. निकिताच्या शरीरावर चाकूचे अनेक वार झाले होते आणि तिचा मृत्यू ३१ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हैदराबाद पोलिसांनी सांगितले, की शर्माने निकिताकडून पैसे घेऊन ते परत केले नाहीत. या तक्रारीनंतर एप्रिलमध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, काही धागेदोरे मिळाल्यानंतर, पोलिसांचे एक पथक आग्रा येथे पाठवण्यात आले, त्यांनी आरोपीला एका फ्लॅटमध्ये पकडले आणि त्याला (फसवणुकीच्या प्रकरणी) नोटीस बजावण्यात आली. अमेरिकेत त्याच्याविरुद्ध आधीच एक गुन्हा दाखल असल्याने आणि अटक वॉरंट प्रलंबित असल्याने, केंद्रीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आनंद गोडीशाला यांची मोठी मुलगी निकिता, गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होती आणि तिथे डाटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक म्हणून काम करत होती. एका निवेदनात, तिच्या कुटुंबीयांनी दिल्लीत शर्माला ताब्यात घेतल्याबददल समाधान व्यक्त केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार आणि त्यानंतरच्या न्यायालयीन कार्यवाहीनुसार, अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर शर्माला अटक करण्यात आली आणि दिल्ली न्यायालयाने त्याला ताब्यात घेतले. शर्माची नोकरी ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ च्या सुमारास गेली आणि नंतर त्याने निकिता व तिच्या कुटुंबीयांकडून पैसे उधार घेतले. निकिताच्या मृत्यूपूर्वी तिला कथितरित्या देय असलेल्या पैशांवरून आर्थिक वाद होते आणि शर्माचे अमेरिकेतील इतरांसोबतही आर्थिक व्यवहार होते, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात अमेरिकेतील कथित हत्येचा तपास आणि हैदराबादमध्ये नोंदवलेले फसवणुकीचे प्रकरण या दोन्हींचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले, की हत्येच्या प्रकरणासंदर्भात दिल्ली न्यायालयात हजर करण्यापूर्वी शर्मा यांना आग्रा येथे पकडण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!