बनावट सही करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही करुन व बनावट शिक्का वापरुन 19 लाख 76 हजार 976 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी राजू रामचंद्र राठोड (ह. मु. रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड, यवतमाळ (रा. दत्तापूर ता. घाटंजी) विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, 465, 467, 468, 471, 472, 474, 477A अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीने अगोदर यवतमाळ येथील जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लऊळकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, सदरचा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपीने उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा यांच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सदर प्रकरणात सरकारी पक्ष व आरोपीचे वकील यांनी बुधवारी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. आरोपीचे वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमुर्ती उर्मिला जोशी – फलके यांनी आरोपी राजू राठोड यांचा तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.

शासकीय मुलांचे वसतिगृह क्रमांक 3 येथील गृहप्रमुख राजू राठोड कार्यरत असतांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन (पांढरकवडा) यांच्या बनावट सहया करुन शासकीय रकमेचा अपहार केल्याबाबतची लेखी तक्रार गृहपाल सचिन आजनकर (वय 42) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरुन आरोपी विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले. या पुर्वी प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी गृहप्रमुख राजू राठोड विरुद्ध तपासणी समिती गठीत करुन 28 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला होता. सदर तपासणी समितीच्या अहवालावरून राजू राठोड हा शासकीय वसतिगृह क्रमांक 3 येथे कार्यरत असतांना पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी यांचे MTR – 31 या खर्च देयका सोबत असलेल्या वित्तीय मंजूरी आदेश व पुरवठा आदेशावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही व शिक्का वापरुन खर्च देयके बिल यवतमाळच्या कोषागार कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक असतांना सुद्धा सदर मुळ देयकावर मंजूर करण्यात प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही व शिक्का वापरुन सदरचे खर्च देयके मंजूर करुन शासकीय रकमेचा अपहार केला, असा आरोप करण्यात आला. गृहप्रमुख राजू राठोड यांनी सन 2022-23 मध्ये आहार खर्च बाबीवर व्हाउचर क्रमांक 1 ते 4 चे ₹ 9,99,630/-, सन 2023-24 मध्ये साधन सामूग्री बाबीवर व्हाउचर क्रमांक 5 ते 13 चे ₹ 4,59,747/- व ईमारत भाडे एक वर्षाचे 50 टक्के कपात न करता संपूर्ण भाडे रक्कम अतिप्रदान करुन ₹ 5,17,599 असा एकूण 19 लाख 76 हजार 976 रुपयाचा शासकीय रकमेचा अपहार केला.

या वेळी उच्च न्यायालयाने 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर तात्पूरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीने दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता लोहारा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, साक्षीदारांवर दबाव आणू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. नितीन आऊतकर यांनी बाजू मांडली. तर आरोपी राजू राठोड तर्फे वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा यांनी युक्तिवाद केला. लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर ह्या पुढील तपास करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!