महाराष्ट्राच्या सुपुत्राला मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान! आई धाय मोकलून रडली; राष्ट्रपतीही गहिवरल्या…

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले. प्रवीण प्रभाकर जंजाळ (रा. अकोला) यांना गेल्यावर्षी जुलै महिन्यात जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या (Mahar Regiment) पहिली बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते.

दिल्लीत प्रवीण जंजाळ यांना जेव्हा मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले तेव्हा त्यांची आई शालू जंजाळ आणि पत्नी श्यामबाला जंजाळ उपस्थित होत्या. या दोघींनी प्रवीण जंजाळ यांचे मरणोत्तर कीर्ति चक्र स्वीकारले. यावेळी भावूक वातावरण पाहायला मिळाले. मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यासाठी प्रवीण जंजाळ यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यांची पत्नी आणि आई राष्ट्रपतींच्या व्यासपीठासमोर आल्या. यावेळी प्रवीण जंजाळ यांनी कशाप्रकारच्या निडरतेने दहशतवाद्यांना नामोहरम केले, याबद्दल सांगण्यात आले. आपल्या मुलाच्या पराक्रमाची कहाणी ऐकताना शालू जंजाळ यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रवीण जंजाळ यांच्या आईला रडताना पाहून पंतप्रधान मोदीही स्तब्ध झाले होते. प्रवीण जंजाळ यांची आई कीर्ति चक्र स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींच्या जवळ गेली तेव्हा त्यांना रडू अनावर झाले. त्या अक्षरश: धाय मोकलून रडल्या. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. प्रवीण जंजाळ यांच्या आईला राष्ट्रपतींनी आलिंगन दिले. हा एकूण प्रसंग मन हेलावून टाकणारा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 जुलै 2024 रोजी देशासाठी लढताना शहीद झाले होते. ते अवघ्या 24 वर्षांचे होते. 6 जुलैला भारतीय लष्करातर्फे कुलगाम येथे एक सर्च ऑपरेशन सुरु होते. प्रवीण जंजाळ या लष्करी मोहीमेत सहभागी होते. त्यांनी दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली टिपताच इतर सैनिकांना सतर्क केले. त्यावेळी दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. मात्र, प्रवीण जंजाळ यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तर देत उलटा गोळीबार केला. यामुळे दहशतवाद्यांना तिथून निसटता आले नाही. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरु असतानाही प्रवीण जंजाळ यांनी न डगमगता दोन दहशतवाद्यांना अचूक गोळ्या झाडून दोघांना ठार मारले. मात्र, या सगळ्यात दहशतवाद्यांची एक गोळी त्यांच्या डोक्यात शिरली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. तरीही प्रवीण जंजाळ शेवटपर्यंत लढत राहिले आणि लढता-लढताच त्यांनी जीव सोडला.

प्रवीण जंजाळ यांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यासाठी भारत सरकारतर्फे त्यांना लष्करातील अत्यंत प्रतिष्ठेचं मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आलं. हा सन्मान स्विकारताना आईला मात्र अश्रू रोखता आले नाहीत.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…

सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…

जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!