अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

मुंबईः छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. तुषारच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

तुषार घाडीगावकर (रा. भांडूप, मुंबई, मूळ रा. सिंधुदुर्ग) याने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये काम केले होते. तर ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’, या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. तसेच ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच ‘सन मराठी’ वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतही तो झळकला होता.

तुषार घाडीगावकर याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाची सुरुवात केली होती. रुपारेलच्या नाट्य विभागात तो परिचित चेहरा होता. युवा अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे. तुषारने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

अभिनेता अंकुर वाढवे याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात ! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो’, असे अंकुर वाढवे याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टवर अभिनेता वैभव मांगलेने प्रतिक्रिया व्यक्त केली. “माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात… अपेक्षा आणि वास्तव यांचं गणित कधीच जुळतं नाही… दोहोंमधली दरी वाढते आहे.. लोक बोलत नाहीत… ऐकायला कान नाहीत… उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही.. आत्मीयता नाही. अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का ?? सगळ्यात असून” असे वैभव मांगले यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!