
राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार…
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विधानपरिषदेतील आमदार इद्रिस नायकवडी यांना अज्ञाताने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू, अशी धमकी या पत्रात दिली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी आमदार नायकवडी यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे आमदार नायकवाडी यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना पत्र लिहून समान नागरी कायद्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची मागणी केली होती. त्यानंतर, त्यांना ही धमकी देण्यात आलीय.
सरकारकडून राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असताना, आमदार नायकवडी यांनी त्याविरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र देऊन या मुद्द्यावर पक्षाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे नमूद करत, राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या कायद्याबाबत आणि सरकारच्या निर्णयावर पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, पत्र पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीसानी दिली.
दरम्यान, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील महायुतीसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, सत्तेत सहभागी झाल्यानंतरही त्यांनी आपली वैचारिक भूमिका बदलली नाही. आपण छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा पुढे नेत आहोत. यशवंतराव चव्हाण यांचीच विचारधारा आणि सर्वधर्मसमभाव जपत असल्याचंही त्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून सांगितले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर इद्रिस नायकवडी यांच्याकडे पक्षातील वरिष्ठांकडून राजीनामा मागण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. याबाबतही इद्रिस नायकवाडी यांनी यापूर्वी भूमिका मांडली होती. मला तशी कुठलीही विचारणा झाली नाही आणि आपण राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता, समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरुन त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे.

