
पूर्णेकर हत्याकांडातील पाचवा हेल्मेटधारी आरोपी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपेक्षा वेगळा – राम पूर्णेकर…
ठाणेः प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील पाचवा हेल्मेट घातलेला आरोपी आणि पोलिसांनी अटक केलेला अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू, याच्याबाबत पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी शंका उपस्थित केल्यामुळे, खळबळ उडाली आहे. हेल्मेट घातलेला आणि फरार असलेल्या या आरोपीची शरीरयष्टी आणि सीसीटीव्ही फूटेजमधील व्यक्ती, यांच्यात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
प्रदीप पूर्णेकरांची हत्या केल्यानंतर सीसीटीव्हीमधील दुचाकीवरील हेल्मेट घातलेला मारेकरी अनेक दिवसांपासून फरार होता. संतोष मेहिलाल कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू हे दोन मारेकरी फरार होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
परंतु, या प्रकरणात राम पूर्णेकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राम पूर्णेकर म्हणाले, की जो पाचवा आरोपी पकडला गेला आहे, त्याला पाहून आपल्याला संशय येतो आहे. पपलू उर्फ अमितला पाहून थोडी शंका येते. अमितची शरीरयष्टी पाहून हेल्मेट घातलेला मारेकरी तोच आहे. एआयवर त्या मारेकऱ्याचा फोटो एडीट केला तो हा नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे. तो पाचवा आरोपी डमी वाटतो आहे.
राम पूर्णेकर पुढे म्हणाले की, या हत्येमागे मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मीनाक्षी शिंदे हीच या प्रकरणाची मास्टरमाईंड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला आहे. पण अद्याप त्यांची भेट होऊ शकलेली नाही. पुढील काही दिवसांमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. या आंदोलनातून मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना फाशीची शिक्षा द्या किंवा मोक्कातर्गंत शिक्षेची मागणी करणार आहे.
राम पूर्णेकर यांच्या दाव्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे ठाण्यासह राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

