संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या असलेल्या श्वानाला एका माथेफिरूने चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित घटना 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता घडली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कॅफेच्या परिसरात एक कुत्रा नेहमी बसलेला असायचा. 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता एका माथेफिरूने कुत्रा शांत बसलेला असताना खिशातून चाकू काढून श्वानाच्या पोटात खुपसला. श्वानाने तडफडून जागेवरच प्राण सोडला. दरम्यान, सकाळी रस्त्यावर हा कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडलेला पाहून, कॅफेचे मालक काळे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता सर्व प्रकार समोर आला.

श्री. काळे यांनी याची माहिती ईफ केअर संस्थेचे अध्यक्ष धनराज शिंदे यांना दिली होती. तर शिंदे यांनी याप्रकरणी प्रथम वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यानंतर उस्मानपुरा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम 11, 20 सह भादंवि 429 अन्वये गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!