छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा म्हणाला…
पुणेः राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छगन भुजबळ सोमवारी (ता. १०) पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितानाच स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व तपशी घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील याला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटील याने मंत्री छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुण्याला एका कार्यक्रमासाठी आले होते. संध्याकाळचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना धमकीचा फोन आला. भुजबळ कार्यक्रमात असल्यामुळे तो फोन त्यांचा कार्यकर्त्याने उचलला. तुम्हाला मारायची मला सुपारी मिळाली आहे, सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगितले, असं धमकी देणाऱ्यानं सांगितले. तसेच, पुढे बोलताना उद्या तुम्हाला मारणार असल्याचेही धमकी देणारा फोनोवर म्हणाला होता.
सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुणे पोलिसांनी प्रकरणाची सर्व माहिती घेऊन चौकशी सुरू केली. संशयितचा शोध सुरू करण्यात आला. अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी महाडमध्ये बेड्या ठोकल्या. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.