आकाशवाणी भवनात बेकायदा धरणे; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी केली एफआयआर दाखल…

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांनी मंगळवारी (ता. ६) आकाशवाणी भवनच्या आवारात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या आघाडीने संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत (नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे मुख्यालय) मोर्चा काढण्याची योजना आखली होती. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आली नव्हती किंवा देण्यातही आली नव्हती.

आयोगाच्या कार्यालयाजवळ आंदोलकांना थांबवण्यात आले. त्यानंतर अनेक विरोधी पक्षनेते आणि खासदार आंदोलनासाठी बसले. नंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी इतर नेत्यांसह आकाशवाणी भवनच्या आवारात दाखल झाले आणि तिथे त्यांनी आंदोलन केले.

दिल्ली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नेत्यांनी विनापरवाना परिसरात प्रवेश करून ठिय्या आंदोलन केले होते. त्यात असेही म्हटले आहे की राहुल गांधींनी तो परिसर सोडण्यास नकार दिला. पोलिसांच्या निवेदनानुसार, जोपर्यंत खासदारांच्या शिष्टमंडळाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही, असे राहुल गांधी यांनी पोलिसांना सांगितले.

त्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. काँग्रेस नेते आणि इतर आंदोलकांना परिसराबाहेर काढून ताब्यात घेण्यात आले. शहर पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान सुमारे २६० जणांना ताब्यात घेण्यात आले. या गटात १० खासदारांचा समावेश होता. ताब्यात घेतलेल्या नेत्यांना किंग्सवे कॅम्प येथील न्यू पोलीस लाइन्समध्ये नेण्यात आले आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या दिवसभराच्या आंदोलनानंतर ही पोलीस कारवाई करण्यात आली. इंडी अलायन्सने मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आकाशवाणी भवनच्या आवारात अनधिकृत प्रवेश आणि त्यानंतर परिसरात झालेल्या आंदोलनाशी एफआयआर संबंधित आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कलमांविषयी अधिक तपशील अपेक्षित असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!