
प्रकृती अस्वास्थ्यानंतरही सुटी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; अशोक उईके यांची शाळेला भेट…
गडचिरोली: गडचिरोलीतील एका आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी साप चावल्याने तीन मुलींना जीव गमवावा लागला होता. सरकारनेही या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांसह संचालकांवर कारवाई केली होती. आता, पुन्हा एकदा गडचिरोलीतील दुसऱ्या आश्रमशाळेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकृती बरी नसल्याने एका विद्यार्थिनीला सुटी न दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरीच्या शासकीय आश्रमशाळेत सोमवारी सायंकाळी एका विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. राणू कृष्णा हलामी (वय १४) असे तिचे नाव असून, आठवीत असलेल्या राणूचा वसतिगृहात मृत्यू झाल्यानंतर आता तिच्या पालकांनी आश्रमशाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रकृती बरी नसल्याने राणू घरी जाण्याचा आग्रह करीत होती. मात्र, तिला खोलीत बंद केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करुन पीडित कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी गावकरी देखील आक्रमक झाले आहे. त्यामुळे आज, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सोनसरी आश्रमशाळेला अचानक भेट देत राणूच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे आश्वासनही उईके यांच्याकडून देण्यात आले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सर्पदंश प्रकरणी मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली. या घटनेत तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्था सचिव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह शाळेच्या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

