‘लहरा दो तिरंगा’ यात्रेविरोधात नोटीस बजावल्यानंतर काही तासांतच अभिजित दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात…

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कॅनॉट प्लेस येथे पक्षाच्या प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते जात होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. सीजेपीचा ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव होता.

आज (ता. १६) सकाळी २० हून अधिक दिल्ली पोलीस कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिश गवांदे यांच्या निवासस्थानी पोचले. अभिजीत दीपके हे गवांदे यांच्या निवासस्थानात राहात आहेत. त्यांनी दीपके यांना एक नोटीस बजावली. त्यात म्हटले होते की कॅनॉट प्लेस परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू आहे. पोलिसांनी दीपके यांना कॅनॉट प्लेस येथे सभा आयोजित न करण्याची विनंती केली. नवी दिल्ली महानगरपालिकेने (एनडीएमसी) त्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याची माहिती दिली.

नवी दिल्ली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २२ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

निवडक आंदोलकांना पर्यायी ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी सुविधा देण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला आहे. प्रशासकीय कारणास्तव सेंट्रल पार्क शुक्रवार आणि शनिवारी लोकांसाठी बंद राहील, असे नवी दिल्ली महानगरपालिकेने म्हटले आहे.

तिरंगा फडकवणे कायद्याच्या विरोधात नाही, परंतु परवानगीशिवाय मोर्चा काढणे आणि गर्दी जमवणे हे निर्बंधांचे उल्लंघन ठरेल आणि पोलीस कायदेशीर कारवाई करतील, अशी माहितीही दीपके यांना देण्यात आली. ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाला योग्य तो आदर देण्यावरील निर्बंधांविषयीही दीपके यांना माहिती देण्यात आली.

यापूर्वी, राष्ट्रीय राजधानीत अराजकता पसरवल्याच्या आणि व्यापक प्रशासकीय निर्बंधांना विरोध केल्याच्या आरोपांचे खंडन करताना, दीपके यांनी ठामपणे सांगितले की, सत्तेत असलेल्यांकडून उत्तरदायित्वाची मागणी करणे ही अराजकता नव्हे, तर लोकशाहीची सर्वांत मूलभूत अभिव्यक्ती आहे.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, दीपके यांनी सार्वजनिक निदर्शनांमुळे आर्थिक घडामोडींमध्ये व्यत्यय येतो हा दावा फेटाळून लावला आणि असा युक्तिवाद केला, की आक्रमक प्रशासकीय कारवाई आणि अचानक लादलेल्या लॉजिस्टिक अडथळ्यांमुळे जनता आणि व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागतो.

शांततापूर्ण आंदोलनांमुळे व्यवसायांना फटका बसत नाही. त्यांना तेव्हा फटका बसतो, जेव्हा सरकार संपूर्ण शहर बंद करण्याचा, इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा, आपल्याच नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा आणि शहराचे युद्धक्षेत्रात रूपांतर करण्याचा निर्णय घेते. आपल्या स्थापनेपासून, झुरळ जनता पक्षाने हेच म्हटले आहे की आम्ही नेहमीच गांधीजींच्या शांतता आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करू आणि आम्ही त्या वचनबद्धतेवर ठाम राहिलो आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!