
होणाऱ्या पत्नीसोबत अलिबागला गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कायदेशीर प्रक्रिया टाळून डॉक्टरने मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात…
अलिबागः पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर एका महिला डॉक्टरने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता, त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, पोलिसही चक्रावले आहेत. हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर मुक्कामी थांबलेला असतानाच अचानक मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अलिबागमध्ये पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या या तरुणाचा वरसोली येथील एका लॉजवर संशयास्पद मृत्यू झाला. हा सारा प्रकार १४ ऑक्टोबर रोजी घडला. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करताच, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत वरसोली समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. त्यांनी वरसोली येथील ‘लोटस लॉज’वर खोली घेतली होती. यादरम्यान अचानक या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, सोबत असलेल्या तरुणीने आणि नातेवाईकांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
या तरुणाचा मृतदेह रुग्णालयात आणला, त्यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात डॉ. भैरवी मालवणकर ड्युटीवर होत्या. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्यामुळे, डॉक्टरने कोणतेही लेखी पत्र न घेता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी न घेताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जातो. मात्र डॉक्टरांनी या प्रक्रियेला बगल दिली.
तरुणाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्यामुळे रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करणे बंधनकारक होते. डॉ. मालवणकर यांनी पोलिसांना फोन केला होता, परंतु ते पोचण्यापूर्वीच नातेवाईक मृतदेह घेऊन निघून गेले होते. मृतदेह परस्पर नेल्यामुळे तरुणाच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. रुग्णालयाने संपर्क साधल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून, तो नातेवाईकांच्या सुपूर्द केला. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ सुरक्षित ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.

