
इंस्टाग्रामवरून १५० अवैध पिस्तुले विकणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या ५ तस्करांना उत्तर प्रदेश एसटीएफकडून अटक…
लखनऊ: पोलीस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) उत्तर प्रदेशातील अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान, एसटीएफने कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई टोळ्यांशी संबंधित असलेल्या एका आंतरराज्य शस्त्र तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करून, मंगळवारी गोरखपूरमध्ये पाच कुख्यात तस्करांना अटक केली. ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा आणि हरियाणातील सोनीपत येथून अत्याधुनिक अवैध शस्त्रे आयात करून पूर्वांचलमधील विविध जिल्ह्यांमध्ये पुरवित असे.
चौकशीदरम्यान, तस्करांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पूर्वांचलमध्ये १०० ते १५० अवैध पिस्तूल विकल्याची कबुली दिली. या अटकेदरम्यान, उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने चार पिस्तुले (३२ बोअर), एक रिव्हॉल्वर (३२ बोअर), पाच जिवंत काडतुसे, मॅगझिन्स, एक बाईक, एक स्कूटर आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे.
एसटीएफ मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या चोरीविरोधी पथकाच्या संयुक्त पथकाने, एका गुप्त माहितीच्या आधारे १४ सप्टेंबरच्या रात्री उशिरा कँटोन्मेंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंध्यवासिनी पार्कजवळ घेराव घालून पाच आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे श्रेयांश यादव उर्फ बबलू, अजित यादव, अभिषेक गौर उर्फ भेली, अभिषेक प्रजापती उर्फ अभि आणि राहुल गुप्ता अशी आहेत.
View this post on Instagram
अटकेनंतर एसटीएफच्या चौकशीतून अत्यंत खळबळजनक तथ्ये समोर आली आहेत. मुख्य आरोपी श्रेयांश यादवचा साथीदार आणि गुन्हेगारी मार्गदर्शक असलेला शशांक पांडे, कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या टोळ्यांशी थेट संबंधित आहे. पंजाबमध्ये बिश्नोई टोळीला शस्त्रे पुरवल्याप्रकरणी शशांकने यापूर्वी तुरुंगवास भोगला आहे. तपास यंत्रणांना श्रेयांश आणि त्याच्या टोळीचा गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांच्या टोळ्यांशी संबंध असल्याची ठोस माहिती मिळाली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
चौकशीदरम्यान आरोपी श्रेयांशने सांगितले की, तो इंदूरच्या बिट्टू इंदोरीमार्फत मध्य प्रदेशातील सेंधवा येथून बोअर आणि गुणवत्तेनुसार १५,००० ते ४०,००० रुपयांना अवैध पिस्तुल खरेदी करत असे. यानंतर, तो ती पिस्तुल गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, महाराजगंज आणि संत कबीर नगर येथील स्थानिक तरुण आणि गुन्हेगारांना ४०,००० रुपयांपर्यंत विकून प्रत्येक पिस्तुलामागे २०,००० ते ३०,००० रुपयांचा नफा कमवत असे. या टोळीने शस्त्रे विकण्यासाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपचा माध्यम म्हणून वापर केला होता आणि आतापर्यंत पूर्वांचलमध्ये १०० ते १५० अवैध पिस्तुले विकली आहेत.
याच टोळीने गोरखपूरच्या गोरखनाथ भागातील कुप्रसिद्ध राजकुमार चौहान हत्याकांडात वापरलेली शस्त्रे पुरवली होती. याच नेटवर्कने संत कबीर नगरमधील कॅम्पियरगंज आणि खलीलाबाद येथे जप्त केलेली शस्त्रेही पुरवली होती. अटक केलेल्या आरोपींवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीचा मुख्य म्होरक्या श्रेयांश यादव याला मुंबईच्या डीएन नगर आणि मध्य प्रदेशातील बडवानी येथून शस्त्र तस्करी प्रकरणी तुरुंगवासही झाला आहे. एसटीएफने गोरखपूरच्या कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध शस्त्र कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, असे एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

