दिशा सालियनचे वडील सीबीआयकडे ‘पुरावे’ सादर करणार, आरोपीला तत्काळ अटक करण्याची त्याच्या वकिलांची मागणी…

मुंबई: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी, तिचे वडील सतीश सालियन, गुरुवारी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या कार्यालयात एक पेनड्राइव्ह सुपूर्द करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत वकील निलेश ओझा असतील. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे आहेत. या प्रकरणात नाव असलेल्यांवर सीबीआयने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

त्यांच्याकडे असे अनेक साक्षीदार आहेत, जे दिशा सालियनच्या मृत्यूच्या आसपासच्या घटनांबद्दल माहिती देऊ शकतात. यापैकी काही साक्षीदारांचा उल्लेख सीबीआयला सादर केलेल्या पत्रात आधीच करण्यात आला आहे, असा दावा सतीश सालियनचे वकील निलेश ओझा यांनी केला आहे.

ओझा यांच्या म्हणण्यानुसार, पेन ड्राइव्हमध्ये एका प्रत्यक्षदर्शीचा व्हीडिओ देखील आहे, त्यामध्ये कथितरित्या घटनेचे वर्णन, दिशाचे पडणे आणि मृतदेहाची स्थिती याचे चित्रण आहे. काही साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये विसंगती आहे. तथापि, हे सर्व दावे कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलाने केले असून, तपासाद्वारे त्यांची अद्याप पुष्टी व्हायची आहे.

निलेश ओझा म्हणाले की, खुनाच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महत्त्वाचे असतात, परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या अनुपस्थितीत, मोबाईल टॉवर लोकेशनसारखे डिजिटल पुरावे देखील तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडिओ, फोटो, संभाषणे आणि फोन कॉलचे फुटेज देखील आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. पेन ड्राइव्ह सुपूर्द करण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, एजन्सीने कायद्यानुसार पुढील कारवाई करावी.

एएनआयशी बोलताना सतीश सालियन यांनी दावा केला की, त्यांच्याकडे आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली आणि रिया चक्रवर्ती यांना गोवणारे पुरावे आहेत. तथापि, या व्यक्तींवरील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि त्यांना कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही.

दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, की आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव नव्हते. त्यांच्या मते, ठाकरे यांनी केवळ एवढेच स्पष्ट केले होते की, ते दिशा सालियन यांना ओळखत नाहीत किंवा भेटलेही नाहीत. या प्रकरणाची चौकशी पुढे चालू राहिली पाहिजे आणि तपासानंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

दिशा सालियनच्या वडिलांनी यापूर्वी आदित्य ठाकरे यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली होती. ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट्स सतीश सालियन यांची बदनामी करणाऱ्या नाहीत, असे सांगत ही मागणी फेटाळून लावली. ठाकरे यांनी माफी मागण्यास, पोस्ट मागे घेण्यास किंवा कोणतीही भरपाई देण्यास नकार दिला आहे.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईत मृत्यू झाला. सुरवातीला तिचा मृत्यू एक अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून, नव्याने सादर केलेली कागदपत्रे आणि डिजिटल सामग्री तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!