
कोस्टल रोडच्या बोगद्यात कार आणि टॅक्सीची जोरदार धडक; वाहतूक ठप्प…
मुंबई: नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बोगद्यात, संध्याकाळी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.
पोलीस कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्याचे काम सुरू केले. मात्र, सायंकाळच्या वेळी रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण असल्याने बऱ्याच वेळेपर्यंत वाहन धीम्या गतीने जात होत्या त्यामुळे वाहनधारकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागले.

