बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक

नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. तो तिला चॉकलेट देत असे. बालिकेला टॅक्सी चालकाचे नाव सांगता आले नाही, म्हणून पालकांनी शाळा प्रशासनाला घटनेची माहिती दिली.

शाळा प्रशासनाने बालिकेला अनेक छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यानंतर तिने चालकाला ओळखले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला.

आरोपीची खात्री पटताच पोलिसांनी त्याला शाळेच्या आवारातच अटक केली. गेल्या आठ महिन्यांपासून तो शाळेत टॅक्सी चालक म्हणून काम करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी खिशात चॉकलेट घेऊन शाळेच्या आवारात फिरताना दिसला. बालिका स्वच्छतागृहात जाताना त्याने पाठलाग केला आणि चॉकलेट देऊ केले आणि जिन्याखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, इतर लहान मुलांना चॉकलेट देत असल्याचे अनेक व्हिडिओ असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हीडिओमध्ये दिसलेल्या इतर मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिस सध्या त्यांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!