
पाच कोटींच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाला धमकावले…
पिंपरी : येथील जयहिंद शाळेसमोरील कार्यालयात, एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाला डांबून त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, नरेंद्र यादव, महादेव साबळे, सुनील डोंगरे व इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महेंद्र रामकरणदास अगरवाल (वय ६२, रा. दुरानी कॉलनी, मार्केटयार्ड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अमर मूलचंदानी याने आपल्या घरावर ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगत फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. अगरवाल यांनी नकार दिल्यावर मारहाण करून, जीवे मारण्याची आणि अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. फिर्यादीकडून त्यांनी जबरदस्तीने तीन धनादेश व प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

