मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी; ३८ पोलिसांचे पथक तयार…

मुंबईः शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने, मुंबई पोलिसांच्या विशेष ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (घोडदळ पथक) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी १.२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

या उपक्रमाची सुरवात २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाने झाली होती, त्यात ३० घोड्यांचा समावेश असलेले घोडदळ पथका स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या पथकाची रचना वर्षभरापूर्वीच निश्चित झाली असली, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी निधीची गरज होती. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाने १७ जून २०२६ रोजी निधी मंजुरीचा औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. या विषेश पथकामुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे.

हा संपूर्ण खर्च चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून केला जाणार आहे. बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत असलेले आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना हा मंजूर निधी काढण्याचे आणि वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या पथकामुळे शहरातील अफाट गर्दीवर नियंत्रण ठेवणे, मुंबईच्या किनारपट्टीवर गस्त घालणे आणि राज्यस्तरीय प्रमुख कार्यक्रमांदरम्यान संचलन करणे यासाठी मुंबई पोलिसांची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पथकाचे व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी मनुष्यबळाचीही रचना करण्यात आली आहे. नायगाव येथील सशस्त्र पोलिस दलातून एकूण ३८ कर्मचाऱ्यांची या पथकात वर्गवारी करण्यात आली आहे. या विशेष पथकात एक उपनिरीक्षक (पीएसआय), एक सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय), ४ हवालदार आणि ३२ अंमलदारांचा समावेश असून, त्यांच्यावर घोड्यांची निगा राखणे आणि गस्त घालण्याची जबाबदारी असेल.

या प्रस्तावावर विचार केल्यानंतर राज्य सरकारने आवश्यक निधी मंजूर केला आहे. अधिकृत आदेशानुसार, हा निधी तातडीने पथकाच्या कामकाजासाठी व अन्य खर्चासाठी वापरला जाईल. यामध्ये घोडे खरेदी करणे, उच्च दर्जाचे खोगीर व सामान, विशेष प्रशिक्षण साहित्य व उपकरणे, घोड्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च आणि व्यावसायिक घोडे प्रशिक्षकांचे वेतन यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!