मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…
मुंबई : एका महिलेला मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् एका क्षणात महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीने तिकीट बूक केले. मात्र ते तिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे महिलेने संबंधित कंपीनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधला. यानंतर पुन्हा एकदा तिला एक कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तिला तिच्या मोबाईलवर एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेनं आपल्या मोबाईलवर सांगितल्याप्रमाणे एनी डेस्क नावाचं अॅप डाऊनलोड केले. याच माध्यमातून चोरट्याने या महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर डल्ला मारला. भांडूप पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपास सुरू केला आहे.
दरम्यान, एनी डेस्क या अॅपच्या माध्यमातून दूरवरचा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल किंवा पीसी सहज हँडल करू शकतो. महिलेने हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तिच्या मोबाईलचा ताबा या अॅपने घेतला. त्यामुळे तिच्या खात्यामध्ये असलेली रक्कम आपल्या खात्यात ओळती करणे आरोपीला सहज शक्य झाले.