
अडीच लाखांचे दागिने चोरून कामगार पसार…
पुणे : मालकाची नजर चुकवून सराफीच्या दुकानातून सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मूर्ती चोरून कामगार फरार झाला आहे. दाखल गुन्ह्यात फरासखाना पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत मालकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेतील सोन्या मारूती चौकात मेसर्स चिमणलाल बभूतमल अॅण्ड कंपनी नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्यांच्याकडे फरारी झालेला कामगार नोकरीस होता. १० ऑगस्टला दुकानात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
हीच संधी साधून कामगाराने २ लाख ४५ हजार ४६० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मुर्ती लंपास केली. चोरी करून पळून गेल्यानंतर हा कामगार दुकानात कामावर आलाच नाही. दुकानातील काही सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल दिसून येत नसल्याने मालकाला चोरीचा संशय आला. तसेच, त्यादिवशी हा कामगार कामावर आला नाही, त्यामुळे त्यांचा संशय बळकावला. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लाला लोणकर करत आहेत.

