नवी मुंबईतील पारसिक टेकडीवरून कार कोसळली थेट रेल्वे रुळांवर; चालक गंभीर जखमी…

नवी मुंबई: नवी मुंबईतील बेलापूरच्या पारसिक हिल परिसरात गुरुवारी टेकडीवरून जात असलेली एक कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि भरधाव वेगाने थेट रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने, ज्यावेळी ही कार टेकडीवरून खाली कोसळली, त्यावेळी तिथून कोणतीही लोकल ट्रेन जात नव्हती. या अपघातात कारचालक तरुण गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या मते, त्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारसिक टेकडीखाली एक रेल्वे बोगदा आहे, ज्यामधून रात्रंदिवस रेल्वेगाड्या धावतात. गाडी अचानक टेकडीवरून घसरली आणि या बोगद्याच्या अगदी समोर असलेल्या रेल्वे रुळावर जाऊन पडली. इतक्या उंचीवरून पडल्यामुळे गाडीचे पूर्ण नुकसान झाले आहे. गाडी खाली पडताच, रेल्वे रुळ आणि त्यावरील विजेच्या तारांचे (ओएचई) नुकसान होण्याच्या भीतीने पनवेल-उरण मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

अपघाताची माहिती मिळताच, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून, गंभीर जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, रेल्वे रुळावर पडलेली, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली कार क्रेनच्या साह्याने युद्ध पातळीवर प्रयत्न करून हटविण्यात आली.

अपघातामुळे ओव्हरहेड वायर आणि रुळांचे किती नुकसान झाले आहे, हे निश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन एका तांत्रिक पथकासह सखोल तपास करत आहे. तपास आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू होईल. कार चालकाचे नियंत्रण कसे सुटले याचाही स्थानिक पोलीस तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!