
बीड हादरलं! विवाहित युवतीवर अत्याचार करत चावडीत ठेवलं बांधून…
बीड: बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका विवाहित युवतीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार करत तिला गावातील चावडीत नेत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिला 10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवलं आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडवून घरी नेले.

घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र शेवटी तिने हिम्मत करून आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने वैभव पटेकर या व्यक्तीवर गंभीर आरोप केले असून त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली. वैभव पटेकर याला ताब्यात घेण्यात आले. पीडितेने अधिकृत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलिस व पिंक पथकाकडून सुरू आहे.
युवतीला गावच्या चावडीसमोर बांधून ठेवल्याचा जो व्हिडीओ आहे, त्यामध्ये तिच्या हाताला आणि पायाला दोरखंड बांधल्याचे दिसत आहे. पोलिस चौकशीत ही विवाहित युवती अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…
बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू…
बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
बीड! फेसबुक लाईव्हदरम्यान रीलस्टारच्या अंगावरुन गेली ट्रॅक्टरची ट्रॉली…

