
रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई…
मुंबईः आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात पोचवणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी ८२ रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शहरातील ४२७ रुग्णवाहिकांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७९ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला असून यामुळे मुंबईतील रुग्णवाहिकांची तंदुरुस्ती (फिटनेस), सुरक्षितता आणि आपत्कालीन तयारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
मुंबईत चार आरटीओ कार्यालयांतर्गत एकूण १,४९८ नोंदणीकृत रुग्णवाहिका आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल (६००), अंधेरी (३३३), वडाळा (३१६) आणि बोरिवली (२४९) यांचा समावेश आहे. परिवहन विभागाने नोंदणीकृत रुग्णवाहिकांची वेळोवेळी तपासणी केली जात असल्याचे म्हटले असले, तरी ताजी आकडेवारी पाहता अनेक वाहने या तपासणीत अयोग्य ठरली आहेत. अंधेरी आरटीओने सर्वाधिक २३७ रुग्णवाहिकांची तपासणी करून २२ वाहनांवर कारवाई केली आणि ४६ हजारांचा दंड ठोठावला. वडाळा आरटीओ क्षेत्रात सर्वाधिक उल्लंघन नोंदवले गेले. येथे तपासलेल्या १४० पैकी ३६ रुग्णवाहिकांमध्ये त्रुटी आढळल्याने १३ हजारांचा दंड आकारण्यात आला.
दर पाच रुग्णवाहिकांपैकी मुंबई सेंट्रल आरटीओने २५ रुग्णवाहिकांची तपासणी करून १२ वाहनांवर कारवाई करत २०,००० रुपयांहून अधिक दंड वसूल केला. बोरीवली आरटीओनेही २५ रुग्णवाहिकांची तपासणी करून १२ वाहनांमध्ये त्रुटी शोधून काढल्या (या दंडाची एकूण रक्कम उपलब्ध होऊ शकलेली नाही). एकंदरीत आकडेवारी पाहता तपासणी केलेल्या दर पाच रुग्णवाहिकांपैकी जवळपास एक रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे.
आरटीओची ही तपासणी केवळ कागदपत्रा पुरती मर्यादित नव्हती. संबंधित वाहन रुग्णवाहिका म्हणून नोंदणीकृत आहे का, वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा, पीयूसी (पीयूसी) आणि आवश्यक परवाना आहे की नाही, याची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तसेच वाहनाच्या प्रकारानुसार चालकाचा परवानाही तपासण्यात आला.
रुग्णवाहिका हे कोणतेही सामान्य व्यावसायिक वाहन नसून आणीबाणीच्या काळात रुग्णांचे प्राण वाचवणारे साधन आहे. त्यामुळे या निष्कर्षांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. खराब ब्रेक, गुळगुळीत टायर्स, नादुरुस्त इमर्जन्सी लाइट्स किंवा वैद्यकीय उपकरणांची कमतरता यामुळे केवळ रुग्णाचाच नव्हे, तर रस्त्यावरील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
याशिवाय रुग्णवाहिका ‘एआयएस-१२५’ मानकांनुसार सज्ज आहे का, हेही तपासण्यात आले. यामध्ये ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रॅचर, प्रथमोपचार साहित्य, सायरन, इमर्जन्सी फ्लॅशिंग लाइट्सची उपलब्धता तपासली गेली तसेच ब्रेक, टायर्स, लाइट्स व इंडिकेटर्स यांसारख्या मूलभूत रस्ते योग्यतेचीही पाहणी करण्यात आली.
मुंबईत सुमारे १,५०० नोंदणीकृत रुग्णवाहिका असताना प्रत्येक रुग्णवाहिका आपत्कालीन सेवेसाठी सज्ज आहे का, असा सवाल याच्या आकडेवारीवरून उपस्थित होत आहे. वाहनांची तंदुरुस्ती, वैद्यकीय उपकरणे व सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी अशा कारवायांची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

