चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप…

उस्मानाबाद: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील आरोपीस उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

चिंचोली (भुयार) येथील अर्जुन धोंडिबा सुरवसे यांनी स्वतःच्या राहत्या घरात २२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ०९ ते पहाटे ०२ वा. दरम्यान चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी जोत्सना हिच्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून केला. याप्रकरणी जोत्सनाचा भाऊ राम मनोहर कांबळे याने फिर्याद दिली होती. जोत्सनाचे लग्न आरोपी सुरवसे याच्याबरोबर २० वर्षापूर्वी झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांना तीन मुली झाल्या होत्या. त्यानंतर दोघांमध्ये लग्न झाल्यापासून चारित्र्याच्या संशयावरुन सतत भांडण तक्रारी होत होत्या. त्यामुळे जोत्सनाने पतीविरुद्ध कासारशिरसी पोलिस ठाण्यात जाचजुलूम होत असल्याची तक्रार दिली होती. हे प्रकरण निलंगा येथील न्यायालयात प्रलंबित असताना पती-पत्नीत तडजोड झाल्यानंतर जोत्सना चिंचोलीत नांदण्यास आली होती.

पण, त्यानंतरही चारित्र्यावर संशय घेत अर्जुनने पत्नीचा खून केला. या प्रकरणी अर्जुन सह त्याची बहीण विनंता विलास सूर्यवंशी व विलास नामदेव सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी राम कांबळे, शेजारी हिराजी दासिमे, तपासिक अंमलदार तथा सहायक पोलिस निरीक्षक वाय.व्ही. बारवकर यांची साक्ष महत्वाची ठरली. या मध्ये चार साक्षीदार फितूर होते. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुषमा घोडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश उमरगा, डी.के. अनभुले यांनी अर्जुन सुरवसे यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने विनंता सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी यांना दोषमुक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!