अट्टल गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात पाटणा जिल्ह्यात ३ अट्टल गुन्हेगार ठार; ठाणे अंमलदार जखमी…

पाटणा: बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मानेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर येथे गंगा नदीजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत, तीन अट्टल गुन्हेगार ठार झाले. या चकमकीत मानेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार (एसएचओ) रजनीश कुमार यांच्या डाव्या हाताला गोळी लागली.

पाटणा विशेष कृती दल (एसटीएफ) आणि पाटणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान मानेर येथे चकमक झाली. जखमी झालेल्या तिन्ही संशयितांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. रजनीश कुमार यांनाही उपचारासाठी पाटणा येथे हलवण्यात आले आहे.

पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कार्तिक कुमार शर्मा म्हणाले, की गुन्हेगारी प्रतिबंधासाठी पोलीस पथके मोहीम राबवत असताना त्यांना शेरपूरमध्ये गुन्हेगार एक मोठा गुन्हा करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली.

ते म्हणाले, की गुन्हेगारी प्रतिबंधाचा भाग म्हणून पोलीस कारवाईची तयारी करत होते. यादरम्यान, ‘एसटीएफ’ आणि जिल्हा पोलीस दल वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई करत होते. आम्हाला अशी माहिती मिळाली की, पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही गुन्हेगार येथे आले असून ते शेरपूरमध्ये एक मोठा गुन्हा करण्याची योजना आखत होते.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचताच संशयितांनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ‘एसएचओ’ जखमी झाले. पोलिस पथक विशिष्ट ठिकाणी पोचताच गुन्हेगारांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान, मानेरचे रजनीश कुमार आणि त्यांच्या पथकाने आपल्या वाहनातून बाहेर पडून प्रत्युत्तर दिले. एक गोळी त्यांना चाटून गेली आणि त्यांच्या गणवेशातून आरपार गेली. गुन्हेगारांनी इतर कर्मचाऱ्यांवरही गोळीबार केला, असे शर्मा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की गोळीबारानंतर तीन संशयित जखमी अवस्थेत आढळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील कारवाई चालू असून, व्हीडिओग्राफीसह शवविच्छेदन करण्यात येईल.

मृतांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती असे सांगून शर्मा म्हणाले, की अष्टमीच्या दिवशी मानेर येथे झालेल्या एका खुनात त्यांचा सहभाग होता आणि त्या प्रकरणात ते फरार होते. दानापूर आणि शाहपूरसह इतर भागांतील अनेक प्रकरणांमध्येही ते फरार होते. पोलिसांनी १८ गोळ्या झाडल्या, तर गुन्हेगारांनी २४ हून अधिक गोळ्या झाडल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तूल, एक गावठी बंदूक आणि अनेक रिकामी काडतुसे जप्त केली.

दरम्यान, दरभंगा जिल्ह्यातील एका वेगळ्या घटनेत, सकतपूर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक (एएसआय) रणधीर कुमार हे गुडघ्याजवळ गोळी लागल्याने जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फळबागेजवळ दिवसा गस्त घालत असताना रणधीर कुमार जखमी झाले.

त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले, की अधिकाऱ्याच्या गुडघ्याजवळ गोळी लागण्यापूर्वी त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यांना पुढील उपचारांसाठी दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर आहे, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही घटनांचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!