ठाण्यातील पूर्णेकर हत्याकांडाचा तपास अन्य यंत्रणेकडे वर्ग करावा; पूर्णेकर कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका…

मुंबई: ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास संथ गतीने चालू असून, या हत्येचा कट रचणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास काढून घ्यावा आणि अन्य एखाद्या स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र शिंदे यांचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

ठाण्याच्या मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील कार्यालयात शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून हत्येचा कट रचणारे अद्याप मोकाट फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हत्येमागे क्लस्टर पुनर्विकासाचा वाद असल्याचा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.

ही याचिका न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली असून, त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

ठाण्यातील शिवसेनेच्या उबाठा गटाचे विभागाप्रमुख पूर्णेकर यांची हत्या होऊन एक महिना झाला आहे. तरीही मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!