सातबारा वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच; कोप्रोलीचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

उरण: सातबारा पत्रकावर वारसाची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना, कोप्रोलीचे मंडळ अधिकारी मौजे चिरनेर येथील तलाठी आणि कार्यालयातील कोतवाल यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. त्यात मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करून देण्यासाठी कोप्रोलीचे मंडळ अधिकारी के. डी. मोहिते, सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी यांनी संगनमताने शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच एसीबीचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. मागणी सिद्ध झाल्यानंतर सजा चिरनेर तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, कारवाईच्या वेळी सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी हे प्रकृती ठीक नसल्याचे सांगून तेथून निसटल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उरण पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

कोप्रोली मंडळ अधिकारी यांच्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. साध्या वारस नोंदीसाठी लाखो रूपये ते घेत असत. पूर्व भागात होत असलेल्या अनधिकृत भरावांबाबत देखील त्यांनी लाखो रूपये उकळून त्यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!