
धारदार शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्या चौघांना अटक…
अहिल्यानगरः चाकू, कोयता यांसारखी धारदार शस्त्रे हातात नाचवत परिसरात दहशत माजविणाऱ्या चौघांना, एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल साईदीपच्या पाठीमागील भागात कोयता, कत्ती आणि सुरे घेतलेले हे गुंड दहशत माजवत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि दोन दुचाकींसह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई संपत नवनाथ खेडकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संस्कार प्रकाश येवलेकर (वय २२, रा. गजानन कॉलनी नवनागापूर), ईश्वर गणेश नवसुपे (वय २२, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर शस्त्र अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, की रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हे सर्व आरोपी दुचाकीवरुन विनापरवाना धारदार लोखंडी कोयता, कत्ती आणि चाकू सोबत बाळगून दहशत पसरवताना आढळून आले. पोलिांनी तातडीने कारवाई करून आरोपींकडून ११.५ इंच लांबीचा चाकू, १५.५ इंच लांबीचा कोयता, धारदार कत्ती आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

