अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर आरोपीला दोन तासांत बेड्या…

लोणावळा: मावळ तालुक्यातील येळसे येथे अवघ्या साडेसात वर्षे वयाच्या चिमुरडीवर तिच्याच एका नातेवाईकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या गंभीर गुन्ह्याची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि वेगाने चक्र फिरवली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिनेश अर्जुन काळे (वय ४०) याला अटक केली. आरोपी मावळ तालुक्यातील ब्राह्मणोलीचा निवासी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

१४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री नऊ ते पावणेदहाच्या सुमारास फिर्यादीच्या येळसे येथील घरात हा प्रकार घडला. पीडित बालिका ही अल्पवयीन असल्याचे आणि स्वतःची जवळची नातेवाईक असल्याचे माहित असूनही, आरोपीने तिच्या शेजारी झोपून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी २० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर फिर्याद दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांतच आरोपी दिनेश काळे याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ६४(२)(ष), ६५(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम ४, ६, ८, १० आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक केकाण यांनी केली असून, या प्रकरणाचा प्रथम खबरी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!