
पतीला जिवंत गाडण्याचा बारामतीत अभूतपूर्व प्रकार…
बारामतीः पतीच्या सततच्या मारहाणीमुळे संतापलेल्या पत्नीने, पतीची हत्या करून त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर, बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस चौकशीत पत्नीने या नृशंस घटनेमागचे खुलासे केले आहेत.
शर्मिला जगताप, असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे, असे पोलिसांनी सांगितले. पती आपल्याला रोज मारहाण करायचा आणि आपल्याला नोकरी करू देत नव्हता, असे तिने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय काही हादरवणारे खुलासेही आरोपी महिलेने केले आहेत. ती म्हणाली, की नवऱ्याने आपली अवस्था एखाद्या मोलकरणीसारखी केली होती. बी फार्मपर्यंत शिक्षण झाले असूनही तो नोकरीसाठी घराबाहेर जाऊ देत नव्हता. आपल्याबरोबरच तो मुलांनाही मारहाण करत असे.
बारामती शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील एका सदनिकेमध्ये प्रवीण जगताप आणि त्याची पत्नी आपल्या मुलांसह राहते. त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वादविवाद होत होते. त्याच्या या वागण्याला कंटाळून शर्मिलाने प्रवीणला मारून त्याला जमिनीत गाडून टाकण्याचा कट रचला. सदनिकेच्या बाल्कनीमध्ये बाग तयार करण्याची तिची इच्छा होती. बागेमध्ये माती पसरण्यासाठी तिने कट्टा बांधून घेतला होता. प्रवीण घरी आल्यानंतर तिने एक विशिष्ट औषध पाजून त्याला बेशुद्ध केले आणि नंतर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. बॅटचा प्रहार वर्मी लागल्यानंतर तो मरण पावला, असे समजून तिने त्याला बांधून घेतलेल्या कट्ट्यामध्ये जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला आणि वरून माती टाकली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की त्याला पुरल्यानंतर एका मजुराला बोलावून कट्ट्यावर टाईल्स लावण्याचा आरोपी महिलेने प्रयत्न केला. परंतु, मजुराला संशय आल्याने त्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कट्ट्यामधून प्रवीणला बाहेर काढले आणि पत्नी शर्मिला हिला बेड्या ठोकल्या. या अभूतपूर्व घटनेने बारामती परिसरात खळबळ उडाली असून, महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

