
सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…
सिंधुदुर्ग: कॉलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिचा निर्घृण खून करणाऱ्या साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ- धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याला त्याच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून चाकूने १७ ते १८ वार करून दामिनीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. साहिल याला कुडाळ पोलिसांनी अटक करून रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
दामिनी पालव आणि संशयित साहिल धुरी या दोघांमध्ये ओळख होती. दामिनी पालव कुडाळ तालुक्यातील एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करत होती. शनिवारी (ता. १७) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला गेली होती. सायंकाळी नेहमीप्रमाणे ती एस. टी. बसने कडावल येथे उतरली आणि चालत वर्दे येथील आपल्या घरी जात होती. मात्र, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कडावल-वर्दे रस्त्यापासून ५० ते ६० मीटर अंतरावर ‘सायल्याचा व्हाळ’ (ओहोळ) येथे तीक्ष्ण हत्याराने खून केला.
View this post on Instagram
दामिनी हिचा खून केल्यानंतर साहिल आपल्या ताब्यातील मोटारसायकलने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या मठ येथील घरी गेला. त्याच्या हाताच्या तळव्याला जखमा होऊन रक्त आल्याचे त्याच्या घरच्यांनी पाहिले आणि त्याला विचारणा केली. मात्र, त्याने त्याचे कारण सांगितले नाही. नातेवाईक त्याला एका डॉक्टरकडे घेऊन गेले. तेथून घरी आल्यानंतर त्याने जेवण केले आणि झोपला. रात्री ११.३० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत त्याने घरच्यांकडे या घटनेबाबत वाच्यता केली नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे.
दामिनीचा खून झाला, त्या घटनास्थळापासून घाई-गडबडीत रस्त्यावर येऊन स्लेंडर मोटरसायकलवरून काळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेल्या युवकाला कडवलच्या दिशेने जाताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. या माहितीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे डिगस येथील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासले. त्यात संशयित वर्णनाचा युवक आणि मोटरसायकल दिसली. सदर मोटरसायकलचा नंबर व तांत्रिक माहितीच्या आधारे हळदोणेच्या माग घेत पोलिसांचे पथक वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात पोहोचले.
दामिनी कुडाळ तालुक्यातील एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करत होती. तर साहिल धुरी याने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला आहे. तो गोवा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो ते काम सोडून गावी आला. इन्स्टाग्रामवर दामिनी आणि संशयित साहिल या दोघांची मागील दोन वर्षांपासून ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे समजते. दामिनीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या साहिलने वारंवार दामिनीला प्रपोज केले होते. मात्र, दामिनीने त्याला नकार दिला होता. तरीही या दोघांचे मोबाईलवर संभाषण असायचे. आपण प्रेम करतो ती प्रतिसाद देत नाही, याचा राग साहिलच्या मनात होता. खून केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
दामिनी शनिवारी सायंकाळी बसने कडवल येथे उतरली आणि आपल्या घरी चालत जात होती. ती चालत घरी जाते, याची माहिती साहिलला होती. तो आधीच मोटरसायकलवरून येऊन कडवल-वर्दे रस्त्यावर तिची वाट पाहत थांबला होता. ती चालत असताना त्याने तिला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर ती दोघे रस्त्याच्या काँक्रीटपासून काही अंतरावर ओहोळाच्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी त्याने दामिनीवर चाकूसारख्या हत्यारांनी क्रूरपणे तिच्या गळा, पोट व पाठीवर अतिशय क्रूरपणे वार करत तिचा खून केला. वार करण्यासाठी त्याने चाकू वापरल्याची माहिती समोर आली आहे. तो चाकू पोलिसांनी अद्याप हस्तगत केलेला नाही. दामिनीच्या अंगावर त्याने १७ ते १८ वार करत तिला निर्दयपणे संपविले. तिला संपविल्याच्या इराद्यानेच तो आला होता, असे दिसून आले.
घटनास्थळी तपासात पोलिसांना तिचा मोबाईल सापडला नव्हता. तो मोबाईल ‘स्विच ऑफ’ येत होता. संशयिताने तो फेकून दिल्याच्या संशय होता. मात्र, संशयित साहिलने तो मोबाईल स्वतःकडे ठेवला होता. त्याच्याकडून दामिनीचा आणि त्याचा असे दोन्ही मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
दामिनीचा खून करणारा साहिल धुरी याला शनिवारी रात्रीच ११.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेऊन कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडके, हनुमंत भोसले व सुधीर सावंत, सहाय्यक फौजदार विलास डिंगणकर, अमर कांडर आदींनी संशयिताला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…
कोल्हापूर हादरलं! मंदिर परिसरात स्पीकरचा आवाज अन् मुलीचा चिरला गळा…
सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…
नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…
प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

