सांगलीत किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं…

सांगलीः कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे., सांगलीजवळील कुपवाडमध्ये ही घटना घडली. अत्यंत किरकोळ कारणांवरून झालेल्या या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी, कुपवाडमध्ये शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पती-पत्नीवर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मनीषा केसरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नंतर त्यांचे पती मोहन केसरकर यांचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केसरकर यांचा शेजारी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

थरकाप उडविणाऱ्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख याला ताब्यात घेतले असून, वेगाने तपास चालू आहे. गुन्ह्यातील आवश्यक पुरावे गोळा करून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कुटुंबाची भेट घेऊन, आरोपीचा एन्काउंटर करण्याची मागणी केली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत, आरोपी फरीद शेख याचे अतिक्रमित घर जमीनदोस्त करण्यात आले. एखाद्या आरोपीचे घर पाडल्याची ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरीद शेख आणि केसरकर कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. फरीद शेख हा पीडित कुटुंबाच्या घरावर रात्रीच्या वेळी दगड फेकायचा, टॉर्च मारायचा, तसेच दारात कचरा आणि खरकटे पाणी टाकायचा. त्याचबरोबर महिलेकडे बघून थुंकायचा. या कृत्यांमुळे केसरकर कुटुंब त्रासले होते. १५ ऑगस्टला शेख आणि केसरकर कुटुंबात अशाच कारणांवरून वाद झाला. या वादातून आरोपी फरीद शेखने केसरकर दाम्पत्यावर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!