
नाशिक जिल्ह्यातील जवानावर काळाने घातला घाला; 15 दिवसांपूर्वीची भेट ठरली अखेरची…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावातील रहिवासी असलेले आणि सैन्य दलाच्या ४११ पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामद पठाण (वय ३२) यांचे आग्रा येथे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले आहे.
आग्रा येथील सैन्य दलाच्या निवास परिसरात काम करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. एका शूर जवानाच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यात आणि सोनांबे गावावर शोककळा पसरली आहे. पॅरा कमांडो शाकिब पठाण हे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी कर्तव्यावर हजर झाले होते. सुट्टीवरून परतल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
View this post on Instagram
शाकिब पठाण यांचं इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण सोनांबे येथील जनता विद्यालयात झाले होते. तर त्यांचे पुढील बारावीचं शिक्षण सिन्नर महाविद्यालयात पूर्ण झाले होते. सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची, हे त्यांचं बालपणापासूनचं स्वप्न होते. आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गावातीलच पर्सनल करिअर अकॅडमीमध्ये अत्यंत खडतर प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ते लष्करात दाखल झाले.
दरम्यान, शासकीय आणि लष्करी सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर, सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आणि वाहनाने सोनांबे येथे आणण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. मुस्लिम रितीरिवाजांनुसार आणि लष्करी व शासकीय इतमामात शूर जवानाला अंतिम निरोप दिला जाईल. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा साजन आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…
जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

