श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल…

पुणे : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 11 ते 15 जुलैदरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत संबंधित मार्गांवरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

12 जुलै लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)
या टप्प्यात पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला या पर्यायी मार्गाने सोडण्यात येतील. तर सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

13 जुलै यवत ते वरवंड (वरवंड मुक्काम)
या टप्प्यात पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना हडपसर-मगरपट्टा-लोणीकंद-केसनंद-वाघोली-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तर सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे हा पर्यायी मार्ग लागू राहणार आहे.

वरवंड ते उंडवडी (बारामती) – 14 जुलै
14 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरवंड ते उंडवडी (बारामती) या टप्प्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या पर्यायी मार्गाने जातील. याच दिवशी बारामती-पाटस आणि बारामती-दौंड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या मार्गावरील वाहने भिगवणमार्गे बारामतीकडे वळविण्यात येतील. पाटसहून बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामती हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.

उंडवडी ते बारामती – 15 जुलै
15 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती-पाटस आणि बारामती-दौंड हे मार्ग बंद राहतील. त्यामुळे या मार्गावरील वाहने भिगवणमार्गे बारामतीकडे वळविण्यात येतील. बारामतीहून बाहेर पडणाऱ्या वाहनांनाही भिगवणमार्गेच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

बारामती ते सणसर – 16 जुलै
16 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा मार्ग बंद राहणार आहे. वालचंदनगर आणि इंदापूरकडून येणारी वाहने जंक्शन-कळस मार्गे बारामतीकडे वळविण्यात येतील. बारामतीहून येणाऱ्या वाहनांसाठी भिगवण-कळस-जंक्शन हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सणसर ते निमगाव केतकी – 17 ते 18 जुलै
17 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून 18 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीहून इंदापूरकडे जाणारी वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर किंवा बारामती-भिगवण-इंदापूर या मार्गाने जातील. इंदापूरहून बारामतीकडे येणाऱ्या वाहनांसाठी इंदापूर-बावडा-कळंब-बारामती तसेच इंदापूर-भिगवण-बारामती हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील.

निमगाव केतकी ते इंदापूर – 18 जुलै
18 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकीहून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या काळात वाहनांना लोणी देवकर-कळंब-जंक्शन मार्गे किंवा लोणी देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

इंदापूर – 19 जुलै
19 जुलै रोजी पहाटे 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत अकलूजहून बारामतीकडे जाणारी वाहने अकलूज-बावडा-नातेपुते-बारामती या मार्गाने वळविण्यात येतील. तसेच इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक या बायपास मार्गाने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी – 19 आणि 22 जुलै
19 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत तसेच 22 जुलै रोजी पहाटे 2 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंदापूर-अकलूज मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. इंदापूरहून अकलूजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तर अकलूजहून इंदापूरकडे येणारी वाहने अकलूज-नातेपुते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गाचा वापर करतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!