अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…
कराची: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (वय ३४) पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. पाकिस्तानमधून तिने एक संदेश धाडला असून, प्रसारमाध्यमांनाही विनंती केली आहे.
पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अंजू हिची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजूने देशाची सीमा ओलांडली आणि तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले आहे. पाकिस्तानच्या तपास यंत्रणांच्या परवानगी नंतर रविवारी तिला प्रवेश देण्यात आला. अंजूने सीमेपलिकडून एक संदेश दिला आहे.
अंजू तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी कायदेशीर व्हिसा घेऊन गेली आहे. पाकिस्तानच्या तपास यंत्रणेने तिला देशात येण्याची परवानगी दिली आहे. अंजू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात घुसली आणि तिथून इस्लामाबादला गेली. ती वैध व्हिसावर आली असल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती होती. तिची त्यांनी कसून चौकशी केली. अंजू सध्या खैबर प्रांतातील मलाकंद जिल्ह्यात असून सुरक्षा पथकाने तिची चौकशी केली. व्हिसानुसार तिला ३० दिवस पाकिस्तानात राहण्याची परवानगी आहे.
अंजूने सोशल मीडियावरून थेट एक संदेश जारी केला आणि मीडियाला विनंती केली की, ‘मी येथे कायदेशीररित्या आले असून, पूर्णपणे सुरक्षित आहे. मी दोन-चार दिवसात भारतात परत येणार आहे. मी पूर्वनियोजित प्लॅननुसार येथे आले असून, त्याच पद्धतीने परतदेखील येणार आहे. माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मुलांना प्रश्न विचारून त्रास देऊ नये.’ दरम्यान, अंजूचा फेसबुक फ्रेंड नसरुल्ला हा वैद्यकीय प्रतिनिधी आहे. तो अंजूशी लग्न करणार असल्याचा दावा करत आहे. अंजू भारतात परतल्यानंतर पुन्हा पाकिस्तानला येणार आणि त्यानंतर ते दोघे लग्न करणार आहेत असा दावा त्याने केला आहे.
अंजूचे पती अरविंद यांना अंजू पाकिस्तानात आल्याचे समजताच त्यांनी अंजूला परत बोलावण्याचे आवाहन सरकारला केले. त्याच वेळी अंजू म्हणाली की माझे आणि पतीचे नाते फारसे चांगले नाही, ते त्रास देतात आणि तिला त्यांच्यापासून दूर राहायचे आहे. अंजूने 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानातील नसरुल्लाहशी मैत्री केली. त्यांचे चॅटिंग सुरू राहिले आणि त्यानंतर अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तान व्हिसावर तिकडे गेली. एका लग्न समारंभाला हजेरी लावण्यासाठी आले असून भेटून मी परतणार असल्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर सांगितला. मात्र, अंजूचा पती अरविंद सांगतो की, अंजू पाकिस्तानात कशी पोहोचली, याची मला स्वतःलाच माहिती नाही.
प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…