भारतीय वंशाच्या दुकानदाराची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या…

न्यूयॉर्कः अमेरिकेतील टेनेसी येथे एका ६२ वर्षीय भारतीय वंशाच्या दुकानदाराची त्याच्याच दुकानात झालेल्या सशस्त्र दरोड्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी त्यांची १९ वर्षीय मुलगी त्यांच्या बाजूला उभी होती आणि बंदूकधाऱ्याने गोळीबार सुरू करताच ती भीतीने थरथरत पहात राहिली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. हा गोळीबार गुरुवारी रात्री झाला असून, त्यामागील हेतूचा तपास सुरू आहे.

जॅक्सन पोलीस विभागाच्या माहितीनुसार, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुरेश पटेल यांची जॅक्सन येथील रिजक्रेस्ट सेलर्स वाईन अँड स्पिरिट्समध्ये रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पटेल यांनी गोळीबाराच्या काही दिवसांपूर्वीच हे दुकान ताब्यात घेतले होते आणि जेव्हा त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तेव्हा त्यांची मुलगी दुकानातच उपस्थित होती.

स्थानिक डब्ल्यूबीबीजे या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले, की एक मुखवटा घातलेला माणूस दुकानात घुसला, त्याने बंदूक काढून कर्मचाऱ्यांकडे रोख रकमेची मागणी केली. पैसे मिळाल्यानंतर, संशयिताने अनेक गोळ्या झाडल्या, ज्यात पटेल यांना गोळी लागली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला संशयित हा एक कृष्णवर्णीय पुरुष असून, त्याने राखाडी रंगाची हुडी, जीन्स आणि काळ्या रंगाचे वर्क-स्टाईल बूट घातले होते. त्याचा चेहरा पेंटबॉल-स्टाईल मास्कने झाकलेला होता. पोलिसांनी सांगितले, की तो एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून पळून गेला आणि तो सशस्त्र व धोकादायक असल्याचे मानावे, असा इशारा प्रसृत केला.

पटेल यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ते चांगल्या संधींच्या शोधात तीन दशकांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!