‘ब्रँड पॅकेजिंग’ करून देशात बनावट औषधांचा पुरवठा…

नवी दिल्ली: सार्वजनिक आरोग्याच्या आघाडीवर एक अत्यंत भीतीदायक आणि चिंताजनक सत्य समोर आले आहे. बाजारात उपलब्ध असलेली बनावट औषधे आणि आरोग्य उत्पादने पहिल्या नजरेत अगदी मूळ उत्पादनांसारखीच दिसतात. त्यांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि डिझाइन इतक्या बारकाईने कॉपी केलेले असते, की सामान्य रुग्ण किंवा ग्राहकाला खरे आणि बनावट यातील फरक ओळखणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. विशेष म्हणजे, दिल्ली क्राइम ब्रँचने अलीकडेच कर्करोगाच्या बनावट औषधांच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. देशातील १७ राज्यांमध्ये पसरलेल्या या व्यवसायाप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे.

‘एएसपीए-क्रिसिल’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट ऑफ काउंटरफीटिंग इन इंडिया २०२५’ अहवालानुसार, भारतातील सर्वेक्षण केलेल्या जवळपास तीनपैकी एका ग्राहकाला (३३%) गेल्या १२ महिन्यांत बनावट आरोग्य उत्पादनाचा सामना करावा लागला आहे. ही समस्या बनावट कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा खूपच धोकादायक आहे, कारण यामुळे रुग्णांचे जीवन थेट धोक्यात येते.

अनेकदा असा समज असतो, की बनावट वस्तू केवळ अनधिकृत किंवा ऑनलाइन बाजारपेठांमध्येच उपलब्ध असतात, परंतु हे सर्वेक्षण हा गैरसमज दूर करते. बनावट आरोग्य उत्पादनांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी साधलेल्या संपर्कातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

६३% लोकांनी स्थानिक किरकोळ वैद्यकीय दुकाने हेच बनावट औषधांचे स्रोत असल्याचे सांगितले, तर ६०% लोकांना ‘ऑनलाइन एग्रीगेटर प्लॅटफॉर्म’ (औषध वितरण ॲप्स) द्वारे बनावट उत्पादने मिळाल्याचे सांगितले. सुमारे एक तृतियांश लोकांना मल्टी-ब्रँड स्टोअर्स आणि सोशल मीडिया जाहिरातींच्या माध्यमातून या वस्तू विकत घेतल्याचे सांगितले.

बनावट आरोग्य उत्पादने मूळ उत्पादनांपेक्षा सरासरी १८% स्वस्त असतात. अहवालानुसार ९६% लोक नकळतपणे बनावट औषधे खरेदी करतात, परंतु रुग्णांकडे उत्पादनाची सत्यता प्रत्यक्ष पडताळून पाहण्याचा सोपा मार्ग नाही, ही खरी समस्या आहे.

सर्वेक्षणानुसार, केवळ ५२% ग्राहक औषध किंवा आरोग्य उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहतात. तथापि, ६०% लोकांना असा भ्रम आहे, की ते स्वतःच बनावट उत्पादने ओळखू शकतात. लोक सामान्यपणे पॅकेजिंगची गुणवत्ता (६६%), होलोग्राम (४८%),
आणि क्यूआर कोड (४०%) या घटकांच्या आधारावर निर्णय घेतात

परंतु आजचे आधुनिक बनावट औषध निर्माते पॅकेजिंग डिझाइन आणि ब्रँडिंगची तंतोतंत नक्कल करू शकतात. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते केवळ पॅकेजिंगच्या आधारावर औषधाची सत्यता तपासणे जीवघेणे ठरू शकते.

‘ASPA’ नुसार, २०१८ ते २०२५ दरम्यान आरोग्यसेवा क्षेत्रात बनावटगिरीची ५२१ अधिकृत प्रकरणे नोंदवण्यात आली. कोविड-१९ (२०२०-२०२१) या महामारीच्या काळातील सर्वात मोठे संकट म्हणजे बनावट पीपीई किट्स, मास्क, खोकल्याची औषधे, जीवनरक्षक औषधे आणि बनावट लसींच्या प्रकरणांमध्ये झालेली मोठी वाढ, हे होते.

बनावट औषधांचा प्रश्न केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नाही, तर तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असली तरी, जोपर्यंत प्रत्येक औषधाची सत्यता तत्काळ पडताळण्यासाठी एक मजबूत आणि वापरण्यास सोपी डिजिटल प्रणाली लागू केली जात नाही, तोपर्यंत हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनून राहील, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!