
पत्नीने लाईव्ह लोकेशन शेअर करून प्रियकराकडून केली नवऱ्याची हत्या…
हैदराबादः आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये पत्नीने व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडून, आपल्या निरागस मुलीसमोरच आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. या खळबळजनक घटनेमागील कट जाणून पोलीसही थक्क झाले.
मृत रमेश (२३) एका खासगी कंपनीत काम करत होता. रमेशने दोन वर्षांपूर्वी १९ वर्षीय हसिनीशी लग्न केले होते आणि त्यांना एक लहान मुलगी आहे. मात्र, हसिनीचे तिच्या पतीवर प्रेम नव्हते. तिच्या २० वर्षीय प्रियकर युगंधरवर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही त्यांचे अनैतिक संबंध चालूच होते. हसिनीने रमेशला आपल्या आयुष्यातूनच दूर करण्यासाठी, एक धूर्त योजना आखली.
आपला कट यशस्वी करण्यासाठी, हसिनीने तिचा नवरा रमेश याला गुडुपल्ले येथील मल्लेश्वर स्वामी मंदिरात येण्यासाठी राजी केले. रमेश आपली पत्नी आणि लहान मुलीला घेऊन आपल्या बाईकवरून निघाला. हसिनीने संपूर्ण प्रवासात आपले लाईव्ह लोकेशन तिचा प्रियकर युगंधरला पाठवले होते. युगंधर आणि त्याचे भाडोत्री मारेकरी सतत त्या लोकेशनवर पाळत ठेवून होते.
मल्लप्पा कोंडाच्या निर्जन रस्त्यावर पोहोचताच, कटाचा भाग म्हणून हसिनीने तिची पर्स खाली टाकली. रमेशने बाईक थांबवताच, रस्त्याकडेच्या झुडुपात लपलेले युगंधर आणि त्याचे साथीदार धारदार शस्त्रे घेऊन बाहेर आले. आपला जीव वाचवण्यासाठी रमेश आपल्या मुली आणि पत्नीसमोर सुमारे १०० मीटरपर्यंत धावला, पण त्या निर्दयी मारेकऱ्यांनी त्याला घेरले आणि धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा जीव घेतला. या रक्तरंजित घटनेच्या वेळी ती निष्पाप मुलगी तिथेच उपस्थित होती.
हसिनीच्या आईने आपली मुलगी आणि नात बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली, तेव्हा या निर्घृण हत्येचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी तपास सुरू करून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक धक्कादायक सत्य समोर आले. रमेश वाटेत आपल्या पत्नीसोबत दिसत होता, तर हसिनी आपल्या मृत पतीच्या मोटरसायकलवरून दोन अनोळखी पुरुषांसोबत (तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार) परत येताना दिसली.
मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स (सीडीआर) आणि सीसीटीव्ही फुटेजमधील ठोस डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि हत्येमध्ये सामील असलेल्या इतर संशयितांना अटक केली आहे. पोलिस कसून तपास करत आहेत.

