बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूर : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे (वय २३) 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीने त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. 12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीने शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असे चिमुकलीचे वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय. सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्याने पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे उघड झाले. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचे त्यांना समजले. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्याने पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे ठरवले. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्रथम तपास केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली.

पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचेही काही पालकांनी सांगितले. या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

संबंधीत घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

बदलापूर आंदोलनाची टाईमलाईन
सकाळी 7.30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं
सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरु केला. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.
सकाळी 11.10 वाजता मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रीया देताना संयम ठेवण्याचे आवाहान केलं
सकाळी 11.30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले
दुपारी 11.45 वाजता आंदोलकांकडून शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला..
दुपारी 12 वाजता आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली
दुपारी 12.15 वाजता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तातडीची पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली.
दुपारी 12.40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरु केली
दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा रेल्वेट्रॅकवर आले. पोलिसांकडून पुन्हा आंदोलकांना समजवाण्याचा प्रयत्न सुरु झाला
दुपारी 1.10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला.  पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!