
नाशिकमधील अजमेरी बेकरीवर एफडीएचा छापा; १५१ निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त…
नाशिकः अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिकमधील अजमेरी बेकरीवर छापा घालून, १५१ किलो निकृष्ट दर्जाचे केक आणि कप केकचा साठा जप्त केला आहे. भारतनगर, वडाळा रोड परिसरात ही बेकर आहे. एफडीएने बेकरीला व्यवसाय त्वरित बंद करण्याची नोटीसही बजावली आहे. जप्त अन्नपदार्थांची किंमत ३७ हजार ९९० रुपये इतकी आहे.
सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६ अंतर्गत एफडीएकडून तपासणी करण्यात आली. बेकरीत अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. तसेच आवश्यक परवाना आणि उत्पादन प्रक्रियेबाबतही त्रुटी आढळल्या आहेत. केकचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, बेकरीला व्यवसाय त्वरित बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी, जालना शहरातील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. अचानक केलेल्या तपासणीत स्वच्छता आणि अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या. निकषांच्या पालनाचे प्रमाण केवळ ६३ टक्के असल्याने पुढील आदेशापर्यंत परवाना निलंबित करण्यात आला आहे.
एफडीएच्या तपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा एकाच ओव्हनमध्ये, तसेच एकाच पॅनमध्ये तयार केले जात असल्याचे आढळून आले. अन्नपदार्थ गरम आणि थंड ठेवण्यासाठी तसेच तापमान नियंत्रणासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या. कर्मचाऱ्यांकडे एप्रन, हातमोजे आणि डोक्याचे संरक्षण करणारी साधने नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींवरील बॉक्सवर परवाना क्रमांक नसणे, त्यांची स्वच्छता न राखणे, स्वयंपाकाच्या तेलाची नियमित तपासणी न करणे, कचरा वेळेवर न हटवणे आणि अन्न हाताळणीच्या ठिकाणी पाणी साचून राहाणे, अशा त्रुटीही या पाहणीत आढळल्या.
परवाना निलंबित असताना या आउटलेटमधून अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण किंवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा तसेच मानके कायदा २००६ अंतर्गत फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

