
गाझावरील इस्रायली हल्ल्याचा बदला घेण्यासाठी फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने रचला विमान अपघाताचा कट…
तेल अवीव: फ्लायदुबई कंपनीत नोकरी मिळण्यापूर्वीच हमाम अल हम्मामी याने, इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर विमान धडकवण्याची योजना आखली होती. संयुक्त अरब अमिरातीचे सुरक्षा अधिकारी हम्मामी याची चौकशी करत आहे. या चौकशीशी संबंधित असलेल्या दोन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देत ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने हे वृत्त दिले आहे.
इस्रायलची ‘शिन बेट’ या सुरक्षा संस्थेने गेल्या आठवड्यात विमानावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या, फ्लायदुबईचा सहवैमानिक हमाम अल हम्मामी याची चौकशी करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये चौकशी पथक पाठवले आहे.
इस्रायच्या चॅनल १२ ने दोन इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असेही सांगितले, की गाझावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय त्याला शहीद म्हणून मरण्याची इच्छा होती. यूएईच्या तपासाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अल हम्मामीने या वर्षाच्या सुरवातीला तेल अवीवला विमानाने प्रवास केला होता आणि विमान अपहरण करून ते पाडण्याचा विचार केला होता, परंतु तो त्यात अयशस्वी ठरला.
चॅनल १२ ने दोन सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले की, ‘मोसाद’च्या एका अधिकाऱ्याने रविवारी इस्रायली मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना सांगितले की, अल हम्मामीने अलिकडच्या वर्षांत इस्रायलविरोधी असलेल्या अनेक देशांमध्ये छोटे दौरे केले होते. तेल अवीवला विमानसेवा देणाऱ्या विमान कंपन्यांबद्दल चौकशी केल्यानंतर, त्याने फ्लायदुबईमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता.
संयुक्त अरब अमिरातीच्या महाधिवक्त्यांनी या घटनेचे वर्णन दहशतवादी हल्ला, असे केले आहे. इटालियन वृत्तपत्र ‘कॉरिअर डेला सेरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, अल हम्मामीने कॅप्टन स्मित मच्छारवर हल्ला करण्याच्या काही वेळापूर्वी प्रार्थनेसाठी वेळ मागितली होती.

