माथेफिरूचा महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला; तरुणी गंभीर जखमी तर आरोपी पोक्सो कायद्यांतर्गत अटकेत…

नांदेड: एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने बारावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याने, नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयातून ही तरुणी मैत्रिणीसोबत घरी जात असताना, एका माथेफिरूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने, संतापलेल्या रोहित पोहरे नावाच्या तरुणाने या विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने वार करत तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने तिथे जमलेल्या नागरिकांनी धाव घेत तरुणीची सुटका केली आणि हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी रोहित पोहरे हा गेल्या दोन वर्षांपासून पीडित तरुणीचा पाठलाग करत होता. काल ती कॉलेजवरून घरी जात असताना रोहितने तिला अडवून बोलण्याचा आग्रह धरला. मात्र, मुलीने बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीच्या छातीवर पोटावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मध्यरात्री पोलिसांनी आरोपी रोहितवर पॉक्सो आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दोन वर्षांपासून माझ्या मुलीच्या मागे होता. आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना सांगितले होते की, तुमच्या मुलाला समजावून सांगा, माझ्या मुलीला खूप शिकवायचे आहे. तो जीव देतो अशी धमकी सुद्धा द्यायचा. पण, तो एवढे मोठे पाऊल उचलेल याची आम्हाला कधी कल्पनाच नव्हती. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे.

नांदेडमधील या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. पीडित तरुणीची प्रकृती आता धोक्याबाहेर असली, तरी आरोपी रोहित पोहरेला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तरुणांमध्ये हिंसेचा विचार वाढतोय आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे. जिच्यावर प्रेम करतो ती आपला हक्क आहे’ ही विकृत भावना धोकादायक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, अशा विकृत मनोवृत्तीवर कठोर कारवाई झाला पाहिजे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दी. बा. जोशी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!