
मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…
मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून प्रवास करत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. देविदास सस्ते (वय ४४) असे मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते ड्युटी करून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे.
देविदास सस्ते मूळचे कल्याणचे रहिवासी असून सहार वाहतूक विभागात कर्तव्य बजावत होते. बुधवारी आपली ड्युटी संपवून ते नेहमीप्रमाणे अंधेरीहून कल्याण येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून त्यांनी दुपारी ४:१५ च्या सुमारास टिटवाळा धीम्या गतीची लोकल पकडली. ते प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होते.

लोकल घाटकोपर स्थानकातून सुटल्यानंतर मुलुंड स्थानक येण्यापूर्वी, दरवाज्याजवळ उभे असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून खाली रुळांवर कोसळले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, देविदास सस्ते हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. जवळपास चार महिने उपचार घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते पुन्हा एकदा सेवेवर हजर झाले होते. मात्र, बुधवारी दुपारी अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. एका पोलिस कर्मचाऱ्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन
मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

