
केरळच्या नौदल अकादमीत बनावट ओळखपत्रावर काम करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला अटक…
तिरुवनंतपुरम: केरळच्या अत्यंत संवेदनशील एझिमला नौदल अकादमीमध्ये काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथे काम करत होता.
बिप्लब सोरेन (वय ३२) असे नाव धारण करणारी ही बांगलादेशी व्यक्ती, आपले बांगलादेशी नागरिकत्व लपवून नौदल अकादमीच्या लाँड्री विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता.
प्राथमिक माहितीनुसार, सोरेन वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होता. अहवालानुसार, नौदल अधिकाऱ्यांना अलीकडेच त्याच्या वागणुकीबद्दल संशय आला आणि त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. नंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
सखोल तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्या मोबाईल फोनमध्ये अशी कागदपत्रे आणि इतर माहिती आढळली, ज्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. नौदल अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि पडताळणी केल्यानंतर, शुक्रवारी रात्री सुमारे ८:१५ वाजता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अकादमीमध्ये एका बांगलादेशी व्यक्तीच्या शोधाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक परदेशी नागरिक त्याचे राष्ट्रीयत्व उघड न करता जवळपास एक वर्ष सामरिकदृष्ट्या संवेदनशील संरक्षण संस्थेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कसा काम करू शकला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या बांग्लादेशी नागरिकाने बनावट कागदपत्रे मिळवून संवेदनशील संरक्षण संस्थेत प्रवेश कसा मिळवला, याची चौकशी आता अधिकारी करत आहेत. तो अकादमीमध्ये किती काळ काम करत होता, त्याला नोकरी मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली आणि या प्रकरणासंदर्भात काही व्यापक सुरक्षाविषयक चिंता आहेत का, याचाही तपास अधिकारी करत आहेत.
कन्नूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कागदपत्रे नसलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध (महिलांसह) पोलीस कारवाई करत असतानाच ही घटना उघडकीस आली आहे.

